धर्मवीर…

1 फेब्रुवारी…
               1 फेब्रुवारी 1689 मराठ्यांच्या इतिहासातील एक काळा दिवस. मराठ्यांचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज मुघलांनी संगमेश्वरात कैद केले तो दिवस...
                1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यावर थांबले असताना. औरंगजेबाला संभाजी राजे संगमेश्वरला असल्याची खबर लागली. खबर लागताच औरंगजेबाने स्वतःचा मुलगा व मुकर्रब खान यांची रवानगी संभाजीराजांना कैद
करण्यासाठी केली. अचानक हल्ला झाला. सरदेसाई यांच्या वाडयातून संभाजी राजे बाहेर पडले. सोबत होते सरसेनापती मालोजी घोरपडे. पण मुकर्रब खानशी लढता-लढता मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. फितुरीने झालेला दगा
यामुळे मुकर्रब खानाची सरसी झाली. छत्रपती संभाजी महाराज चपळाईने घोडयावर स्वार झाले. वेगाने घोडा सोडला. तेवढयात कवि कलेशाचा आवाज आला.

‘‘राजासाहब मै गिरगया हूँ ’’ राजांनी कलेशाकडे पाहिले, मित्रप्रेमापोटी घोडा वळवला, कलेशाला उचलणार तोच मुकर्रबखान आणि त्यांच्या सैन्याने वेढले. तोच दिवस 1 फेब्रुवारी 1689 चा.राजांचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्केयाच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रबखान राजांना ताब्यात घेऊ शकला. शेवटी 8 वर्ष मुघलांना सळो की पळो करून सोडणारा प्रजाहितदक्ष मराठ्यांचा छत्रपती शंभूराजा जेरबंद झाला.
                  अन निघाली धिंड तुळापूरच्या दिशेने, औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेशच दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
               औरंगाजेब त्यांना तुळापूर येथे मोगल छावणीत शंभूराजांचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करत होता, देहाची कातडी रोज सोलण्यात येत होती. तरीही शंभूराजे जराही डळमळले नाहीत.धर्मासाठी स्वराज्य अस्मितेसाठी लढत राहीले. शेवटचे श्वास मोजत राहिले. किती हा ज्वलंत धर्माभिमान आणि केवढी ही सहनशीलता !
                या छळछावणीतच संभाजी महाराजांचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्यात आले. इतके होऊनसुद्धा संभाजी महाराजांना नैसर्गिक मृत्यू काही आलाच नाही. अखेर 11 मार्च 1689 शके 1610  फाल्गुन वद्य अमावस्येचा तो दिवस होता. दुसर्या दिवशी चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा होता. हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदूंमनात कायमची दहशत निर्माण करावी या हेतूने धर्मांध औरंगजेबाच्या आदेशानुसार अमावस्येला शंभूराजांचे मस्तक धडावेगळे केले गेले.ज्या मस्तकावर सप्तगंगाच्या पवित्र जलाचा रायगडावर अभिषेक झाला होता तेच मस्तक छाटण्यात गेले. ज्या गुढीपाडव्याला घराघरातून गुढ्या उभारल्या जातात त्याच दिवशी शंभूराजांचे मस्तक भाल्यावर टांगून मोगली छावणीतून आसुरी आनंदात मिरवण्यात आले. संभाजीराजे आणि कवी कलशांच्या निष्प्राण देहांचे तुकडे तुकडे केले गेले. क्रौर्याची परिसीमा पार झाली.
                अखेर 39 दिवस यमयातनांचा सहर्ष स्वीकार करून देव, धर्म, राष्ट्र आणि स्वराज्य संस्कृतीच्या रक्षणासाठी शंभूछत्रपतींनी प्राणार्पण केले. 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. मराठ्यांचा छत्रपती वयाच्या 32व्या वर्षीच झुंझता झुंझता मरण पावला. मुघलांचा डाव यशस्वी झाला. पण मराठ्यांचा राजा छत्रपती मरता मरता धर्मरक्षणाचा आदर्शच देऊन गेला.
   धर्मासाठी झुंझावे। झुंझोनी अवघ्यांसी मारावे।
      मरितां मारितां घ्यावे । राज्य आपुले ।। 
             हा धर्ममंत्रच आम्हाला सांगून गेला.
 धर्मवीर संभाजी महाराजांच्या आत्म बलिदानानंतर औरंगजेब सुध्दा म्हणत राहिला,
 सचमुच छावा है छावा शेर का...                       
हमने जबान काट दि ईसकी लेकिन नही कहे वो रेहेम के दो लब्ज़ ईसने....                     
हमने आँखे निकाल दियी ईसकी पर नही झुकायी अपनी आँखे ईसने हमारे सामने..... .                 
हमने हाँथ काट दिये ईसके पर नहीं फैलाये इसने अपने हाँथ हमारे सामने.....                                
हमने पैर काट दिये ईसके पर नहीं टेके ईसने अपने घुटने हमारे सामने.....                                         
हमने गर्दन ऊडा दियी ईसकी लेकिन नहिँ झुकी ईसकी गर्दन हमारे सामने..... .                 
   सचमुच छावा है छावा शेर का.
          स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी वीरमरण पत्करले. अशा थोर शूरवीर, संस्कृतविव्दान, महान साहित्यिक, प्रेमळ, दयाळू, बुद्धिनिष्ठ, प्रजाहितदक्ष, न्यायी, निस्वार्थी, निष्कलंक, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, महातेजस्वी, महापराक्रमी, रणमर्द, क्षात्रवीर, महापराक्रमी, धर्मवीर  शिवपुत्र संभाजी महाराजांना कोटी–कोटी प्रणाम…!!
                             जय शंभूराजे !!
                                                - सुशांत कणसे.
संदर्भ- "छावा",
           "प्रा.नितीन बानुगडे पाटील"

No comments:

Post a Comment