आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण


जन्म- १२ मार्च १९१३
मृत्यु- २५ नोव्हेंबर १९८४

                    मा. यशवंतराव चव्हाण हा मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत होता, माझा सारख्यांचा आजही तो आदर्श आहे.
                   सातारा  जिल्ह्यातील देवराष्ट्रे या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात १२ मार्च १९१३ रोजी या नर रत्नाचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षी पितृछत्र हरपले, प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रे गावात झाले. तर माध्यमिक शिक्षण कराड मधील टिळक हायस्कूल येथे अनेक अडचणीतून झाले. तर एल. एल. बी. चे शिक्षण पुण्यातील लॉ कॉलेजात झाले. त्यांच्या आई विठाबाई यांनी त्यांच्यासाठी अपार कष्ट घेतले. यशवंतरावजी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी सारा सातारा जिल्हा उतरविला होता. १९४७ साली स्वराज्य मिळाल्यानंतर काही काळ सातारा येथे वकिली करून ते १९५२ पासून पूर्ण वेळ राजकारणात उतरले. द्वैभाषिक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ पुरवठा मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून १९५६ ते १९६० त्यांनी काम केले, तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९६२ ते १९८४ एवढा प्रदीर्घ काळ ते भारताचे संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र आणि व्यवहारमंत्री होते. तर काही काळ विरोधी पक्ष नेते, भारताचे उपपंतप्रधान होते. वय वर्षे सोळा ते वय वर्षे एकाहत्तर सुमारे साठ वर्षांचा काळ ते देशसेवेत होते.
                      व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असे त्यांचे गुणवर्णन करता येईल. गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी अविश्र्वसनीय झेप घेतली.यशवंतरावांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहकाराचे तत्व अवलंबिले. सर्व राज्यांत बदल होणे शक्य नव्हते पण काही भागात तो झाला त्यामुळे काही बरे-वाईट परिणामही झालेत. पण राज्याच्या काही भागांतल्या सामान्य लोकांत स्वतःच्या प्रयत्नांनी भांडवल उभारण्याची ईर्षानिर्माण होऊन जो मानसिक बदल झाला तो महत्वाचा होता. पुढे १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून यशवंतरावांना नेहरूनी आमंत्रण दिले. ‘संरक्षण हा विषय तुम्हाला नवाखा असले तरी तुम्ही तो लवकरच आत्मसात कराल’ असं विश्वास नेहरूंनीच व्यक्त केला आणि तो यशवंतरावांनी खरा केला. पुढील काळात साधूंनी गोहात्याबंदीचे आंदोलन पुकारले तेव्हाही इंदिरा गांधीकडून यशवंतरावांना आमंत्रण आले आणि गृहमंत्री पद ताबडतोब स्वीकारण्याचा आग्रह झाला. त्यावेळीही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, अर्थमंत्री (१९७१-१९७५), परराष्ट्रमंत्री (१९७४-१९७७) ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. तेव्हा त्यांची एक कुशल परराष्ट्र मंत्री म्हणून गणना होत असे,म्हणूनच ते सत्तेवर नसतानाही काही देशांचे राजदूत त्यांना येऊन भेटत असतं. १९७७-७८ कालवधीत केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.महाराष्ट्रात संसदीय सचिव, अन्नपुरवठा मंत्री, स्थानिक स्वराज्य मंत्री,द्वैभाषिक मुंबई, संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इत्यादी पदे, तर केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान आणि आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या.खरं तर यशवंतरावांची संपूर्ण कारकीर्दच कोणाही नेत्याला दीपस्तंभासारखी रस्ता दाखवणारी आहे.

            
                       यशवंतरावांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. त्यांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रापुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभले. आपण राज्य करायला सत्तेत कुणासाठी बसलोय याचे भान त्यांना होते. यशवंतराव चव्हाण हे समाजाच्या दु:खाचे भान असलेले नेते होते. यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीसाठी व राजकारण्यांसाठी समाजसेवेचा खरा आदर्श आहेत. त्यांचे विचार देशाला तारणारे व प्रेरक होते. संरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठ्ठ्या अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची नवनिर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राज्य व देश विकासासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे यापुढे ही ठरेल..

आज १२मार्च त्यांची जयंती, या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस शतशः मनःपूर्वक नमन..

यशवंराव चव्हाण यांची कराड येथील कृष्णाकाठावर असलेली समाधी...

त्यांच्या स्मृती जेव्हा जेव्हा मनात जाग्या होत्यात तेव्हा कवी राजा मंगसुळीकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत..

हिमालयावर येता घाला
सह्यगिरी हा धावून गेला,
मराठमोळ्या पराक्रमाने
दिला दिलासा इतिहासाला...
या मातीच्या कणाकणातून
तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने,
जोवर भाषा असे मराठी
“यशवंताची” घुमतील कवने...
                                      - सुशांत रा. कणसे

No comments:

Post a Comment