महाराष्ट्र माझा...

       
                 
                      महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वजातींना सामावून घेऊन हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, क्रांतिसिंह नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. त्या सर्व शूरवीरांचे वर्णन, महाराष्ट्र भूमीचे कौतुक आपल्या लेखणीतून, शब्दांतून अनेक कवी, लेखक, इतिहासकारांनी, प्रतिभावंतांनी करून ठेवले आहे. त्या सर्व प्रतिभावंतांना स्मरून त्यांच्या शब्दसुमनांतून महाराष्ट्र वर्णन पाहूयात...

                    महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी,
             "मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा।
              प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥
              राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
              नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा॥"

अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही
"बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"
हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे.
वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी
"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा" अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे.
वसंत बापटांनीही
"भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा"
असे म्हणत महाराष्ट्र प्रेम व्यक्त केले आहे.
विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र . श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी
" मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा"
हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी
        "माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके।
          परी अमृतातेंहि पैजा जिंके।
          ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥"
      अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे.
मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी "मराठी असे आमुची मायबोली"
म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे.
गं.रा.मोगरे यांनी
"माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित।
किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥"
म्हणून भाषेचा गौरव केला आहे.
ना.के.बेहेरे यांनी
"भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥
भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥" म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले.
संत एकनाथ महाराजांनी
"संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥"
असा परखड प्रश्न विचारला आहे.
ख्रिस्तदास स्टीफन यांनी
"जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा।
तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥"
या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे.
ना.गो.नांदापूरकर यांनी
"माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे"
अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.
         
  
                    महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे  गाठण्याचा निर्धार आपण करावयास हवा.

No comments:

Post a Comment