स्वप्न माझं…

स्वप्न माझं आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,
एकाच दिशेन चालण्याचं…

स्वप्न माझं आहे,
तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन,
एकदा मिठीत घेण्याचं…

स्वप्न माझं आहे,
तुझ्या सोबत राहण्याचं,
छोठसं घरट बांधून,
त्यात दोघांनीच राहण्याचं…

स्वप्न  माझ आहे,
मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,
ते तू रंगवण्याचं ...

स्वप्न माझं आहे ,
तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून,
ते पूर्ण करण्याचं…

❤


भेटत....
ती पण नाही,
भेटत...
मी पण नाही....

निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला
पटत नाही.

फसवत
ती पण नाही,
फसवत
मी पण नाही....

तिला रुसण्याचे दु:ख
आहे,
मला एकटेपणाची
भीती आहे....

समजत...
ती पण नाही,
रागवत.....
मी पण नाही......

कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी

बघत...
ती पण नाही,
थांबत...
मी पण नाही....

जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....

ऐकत..
ती पण नाही,
सांगत..
मी पण नाही....

पण एक गोष्ट मात्र
खरी आहे,
प्रेम माझे आजही
आहे तिच्यावर

नाकारत ..
ती पण नाही,
सांगत...
मी पण नाही.......



माय…

कळतच नव्हत मला,
माय माझी एकटीच का रडायची |
तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची ||

माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची |
काय पहात होती कुणास ठाऊक पण,
पदराखाली मला घट्ट धरून बसायची ||

पाऊस नव्हता तरी सुद्धा, माझ्या अंगावर थेंब पडायची |
मांडीवर मला थोपटतांना,
तिची का झोप उडायची ||

काहीच नव्हते घरात तरी,
ती घराला फार जपायची |
एकच होत लुगड तिला,
तेच ती धुवून रोज नेसायची ||

सणावाराच्या दिवशी मात्र,
माझ्यावर करडी नजर ठेवायची|
जावू नये कुणाच्या घरी म्हणून,
मला घरातच लाडीगोडी लावायची ||

रोजच सकाळी हात जोडून, देवाला काहीतरी मागायची |
गालावर हात फिरवून माझ्या,
बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची ||

मातीच्याच होत्या भिंती,
पांढर्या मातीनेच लिंपायाची |
अंगणात टाकायची सडा नि,
घर शेणाने सुंदर सारवायाची ||

सकाळीही रोजच मला,
घासून अंघोळ घालायची |
चुलीवरल्या भाकरीचा घास,
तिच्या हातानेच भरवायची ||

शाळेत मला धाडतांना, स्वप्ने मोठमोठी बघायची |
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा,
तरी माझ्याकडे पाहून हसायची||

कळतच नव्हत मला,
आई एकटीच का रडायची |
तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची।।

असच काहीतरी……

आमचा देव दगडाचा नाही.
आम्ही दगडात देव पाहणारी
माणसं आहोत.
दगडात देव असतोच, मुर्ती
असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा
असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन    द्यायच्या
भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर
गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी
शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला
शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला
नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद,
प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो
आचार, तो विचार हा टाकायचा भाग.
स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या
सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या
जोरावर बुद्धी विकत घेता येते.’
"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा
वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच
लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस
किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर
जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही,
किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय
काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात
येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही,
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही,
कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.
कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता
आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी
पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या
त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ
सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या
ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच
वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते.
आपण जमिनीवरच आहोत
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप
विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास
होतो.
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक
प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही
गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत
.आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण
.एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर
हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका
होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार
केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला
असेल.
आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या
बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की
उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं
आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष
असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की
आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट
करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना
पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी,
हा!
पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही
वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही
वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून
कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते
पळणार्याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत
नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...
निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की
बुध्दीवर ?बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा
सोडवणार ?
               -व.पु.काळे…

जीवनाच्या वाटेवर…

जीवनाच्या वाटेवर चालावे लागते एकट्याला,
संगती असतात थोड्या काळासाठीच  सोबतीला....

जीवनाच्या वाटेवर चालावे लागते काट्या मधुन,
फ़ुले सुध्दा असतात कधी कधी अधुन मधुन…

जीवनाच्या वाटेवर मिळवण्यासाठी यश, पचवावे लागते पहिल्यांदा अपयश.
यश मिळत नक्कीच प्रयत्नातुन,
पण प्रयत्न करावे लागतात मनातुन…

जीवनाच्या वाटेवर चालने नाही सोपे,
वाटेवरुन जाताना बसतात जबर धक्के,
त्यासाठी लागतात साथीदार  पक्के.

जीवनाच्या वाटेवर असतात खाच खळगे,
या वाटेवरुन जाताना आयुष्य जाते सगळे.
तरीही या वाटेवर सगळे चालतच राहतात,
सुखाच्या एक झुळकेने दुःख सगळे विसरुन जातात…

क्षण…

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा..
पाण्याच्या खळखळत्या प्रवाहाप्रमाणे असतो....
      एकदा स्पर्श केलेल्या पाण्यास जसं आपण
पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
तसंच जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा वाहता प्रवाहच आहे....
        या क्षणाचं सोनं करायचं असेल तर प्रत्येक क्षणाला  समरसून जगायला हवं....
                           आनंदाच्या लाटांवर
                           आरूढ होऊन....
                           आपलं ध्येय गाठायला हवं....

आपल कुणीतरी…

का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे…

     ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे  
     आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे…
     
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे
मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे…

    उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे
    पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे

केव्हा नटता सावरता आपण,
त्याने मनापासुन कौतुक करावे…
      
     का कुणास ठाऊक मला पण वाटते..
     कुणीतरी फक्त आपल्यासाठी असावे...…
                                                         …सुशांत

नाती…

जीवनात नाती तशी
अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात......|
                  काही नाती असतात रक्ताची,
                  तर काही हृदयाची......|
काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही क्षणापुरतीची......|
                   काही नाती असतात,
                   केसांसारखी न तुटणारी,
                   पण वेळ आलीच तर वाकणारी.....|
काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....|
             काही नाती असतात,
             पैशाने विकत घेता येणारी,
            तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......|
काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी.........

शब्द्…

शब्दांनी शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनी शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴे होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴे मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴे जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴे चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी...

"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल"

स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील युवक असा असावा…

चेहेऱ्यावर तेज आहे
देहामध्ये शक्ती आहे
मनामध्ये उत्साह आहे
बुद्धीमध्ये विवेक आहे
हृदयामध्ये करुणा आहे
मातृभूमीवर प्रेम आहे
इंद्रियांवर संयम आहे
मन ज्याचे स्थिर आहे
आत्मविश्वास दृढ आहे
इच्छाशक्ती प्रबळ आहे
धाडसाचे बळ  आहे
सिंहासारखा निर्भय आहे
ध्येय ज्याचे उच्च आहे
सत्य ज्याचा ईश्वर आहे
व्यसनांपासून मुक्त आहे
जीवनामध्ये शिस्त आहे
प्रेमळ ज्याचा सूर आहे
मानवता हेच कुळ आहे
गुरुजनांचा आदर आहे
पालाकांवरती श्रद्धा आहे
दीन-दुबळ्यांचा मित्र आहे
सेवेसाठी तत्पर आहे
देवावारती भक्ती आहे
जीवनामध्ये नीती आहे
चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे
तोच आदर्श युवक आहे…

" ती "

मी जिच्यावर प्रेम केलं
तिचं शरीर कधी दिसलंच नाही
त्यामुळे शरीराची आसक्ती
मनात कधी उफाळलीच नाही……
       मी फक्त नकळत गुंतत गेलो
       तिच्या टप्पोऱ्या सुंदर डोळ्यांवर
       तिच्या लांबसडक कुरळ्या केसांवर
       कधी घातलेल्या मोहक अंबाड्यावर
       तिच्या मधुर हसण्यावर
       न हसण्यामुळे खूप गोड दिसण्यावर ……
मी फक्त प्रेम करतं गेलो
तिच्या निरागस असण्यावर
न भेटलल्या निष्पाप भावनांवर
तिच्या माझ्यावरच्या विश्वासावर
माझ्या निरागस स्पर्शाच्या तिच्या जाणीवेवर
हातात हात देऊन स्तब्ध बसण्यावर
अन वेडा आहेस तू या बोलण्यावर ……
         मी फक्त वेडा होत गेलो
         मी अबोल होताच तिच्या साद घालण्यावर
         माझ्या वेदनांवर फुंकर मारतांना मी गप्पं         बसण्यावर
         माझ्या प्रेमाला तिच्या मनानं समजून                  घेण्यावर
         माझ्या आठवणीत व्याकूळ झालेल्या तिच्या नजरेवर
         तिच्या दगडांपेक्षाही पाषाण मनावर
         अन तितक्याच सुंदर हृदयावर
माझी नजर फक्त
तिचं मन , हृदय , अन आत्म्याकडे होती
माझ्या प्रीतीला वासनेची किनारही नव्हती
म्हणून तर तिचं शरीर
मला कधी दिसलंच नाही
अन माझं प्रेम पाहून ती केव्हा गुंतली
हे तिलाही कळलं नाही
      हा प्रीत गंधच तर मनांना गुंतवून ठेवतो
      अन तिच्या आठवणीत मी बेधुद जगत राहतो
      जे मला हव होतं ते प्रेम मला मिळालंय
     आता कुठलीही आस नाही खंर प्रेम मला  कळलंय .
        -sushant r. kanase

जाणीव


जाणीव
कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते.
कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते .
किती त्रास
द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते .
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते ...